पोटात दुखू लागल्याने तरुण पोहोचला रुग्णालयात, डॉक्टरांनी पोटातून बाहेर काढले 63 कॉईन

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका 36 वर्षीय तरुणाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर 63 कॉईन बाहेर काढण्यात आले आहेत. यामुळे तरुणाचे पोट आहे की पिग्गी बँक अशी चर्चा रंगू लागली आहे. जोधपूरच्या चौपासनी हाऊसिंग बोर्डात राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाला काही दिवसांपूर्वी पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तो तरुण तपासणीसाठी रुग्णालयात गॅस्ट्रोलॉजी विभागात पोहोचला. तेथे डॉक्टरांनी त्याला पोटाचा एक्स-रे काढण्यास सांगितले. यावेळी डॉक्टरांना एक्स-रे अहवालात पोटात काहीतरी असल्याचे आढळून आले.

यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची चौकशी केली असता त्याने काही कॉईन गिळले असल्याचे सांगितले. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याने त्याने ही नाणी बऱ्याच दिवसांपूर्वी गिळली असावी असा अंदाज डॉक्टरांनी लावला. रुग्णावर शस्त्रक्रिया न करता ही नाणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एंडोस्कोपी प्रक्रिया वापरून पोटातून सर्व नाणी काढण्यात आली.

देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात एका व्यक्तीच्या पोटात 250 खिळे, 35 नाणी आणि स्टोन चिप्स सापडल्या होत्या.