पुरस्कारांच्या शर्यतीत ‘कासव’ला सुवर्णकमळ!!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागलेल्या 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली. राष्ट्रीय पुरस्कारांत यंदाही मराठीचा झेंडा डौलाने फडकला असून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळाची शर्यत ‘कासव’ने जिंकली आहे. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ने तीन पुरस्कारांवर मोहोर उमटवली असून ‘दशक्रिया’ हा मराठीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ‘रुस्तम’साठी अक्षय सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘नीरजा’साठी सोनम कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले होते. यात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा आगामी ‘कासव’ हा चित्रपट वरचढ ठरला आहे. सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चित्रपटाचा मान ‘नीरजा’ला तर याच चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार सोनम कपूरला जाहीर झाला आहे. ‘रुस्तम’मधील दमदार भूमिकेसाठी अक्षयकुमार सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला असून आपल्या २६ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘दंगल’मधील झायरा वसीम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तर ‘दशक्रिया’ या चित्रपटासाठी मनोज जोशी सहाय्यक अभिनेता ठरले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने या क्षणी मी खूप भावुक झालो आहे. सर्व ज्युरींचे आणि जगभरातील माझ्या चाहत्यांचे मी आभार मानतो. हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबीयांना समर्पित करतो. रुस्तम माझ्यासाठी स्पेशल चित्रपट होता. या चित्रपटासाठी देशाच्या नेव्हीचा पोशाख घालायला मिळणे ही गौरवास्पद बाब होती. राष्ट्रीय पुरस्कारामुळे हा अनुभव अधिकच सुखद झाला आहे.
– अक्षय कुमार, सर्वोत्कृष्ट अभिनेता (रुस्तम)

अभिनयाच्या प्रवासात आजवर मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. खर सांगायचे तर मी या पुरस्काराबद्दल विचारही केला नव्हता. हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे.
– सोनम कपूर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नीरजा)

आमच्या पर्पल पेबर प्रॉडक्शनच्या व्हेंटीलेटर या पहिल्याच चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
– डॉ. मधू चोप्रा, निर्माती (व्हेंटिलेटर)

एखादा चित्रपट नैराशेवर आधारित चित्रपट आहे असे म्हटल्यावर प्रेक्षक आणि समीक्षक त्या चित्रपटाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. कासवला मिळालेल्या सुवर्णकमळामुळे कासव हा चांगला सिनेमा आहे हे सिद्द होईल. नवीन जन्माला आलेली कासवाची पिल्ले स्वतःहून अंडय़ातून बाहेर येऊन समुद्रात जातात याविषयी ऐकले होते. याचा प्रसंग चित्रपटातही आहे. हा प्रसंग चित्रपटासाठी चित्रित करणे रोमांचकारी अनुभव होता.
– सुनील सुकथनकर, दिग्दर्शक (कासव)

हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारात मजल मारल्याने स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. व्हेंटिलेटरवर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचेही आभार!
– राजेश मापुसकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (व्हेंटिलेटर)

हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. वेशभूषेसाठी मला मिळालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘सायकल’मध्ये एक निरागस गोष्ट आहे. त्यामुळे वेशभूषा करताना लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातली रंगसंगती डोळ्यापुढे ठेवली होती.
– सचिन लोवलेकर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा (सायकल)

कासवला सुवर्णकमळ मिळणे हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. नैराश्येवर आधारित हा चित्रपट आहे. मनोरंजनपर चित्रपट नसतानाही या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांत विशेष स्थान मिळतेय ही नक्कीच समाधानकारक बाब आहे.
– सुमित्रा भावे, दिग्दर्शिका (कासव)

पाचव्यांदा ‘सुवर्णकमळा’वर मोहोर
राष्ट्रीय पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात मराठी चित्रपटाला पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले आहे. १९५४ साली आचार्य अत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘श्यामची आई’या चित्रपटाने पहिल्यांदा सुवर्णकमळ पटकावले होते. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनंतर संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ या चित्रपटाने सुवर्णकमळ पटकावले होते. त्यानंतर मात्र मराठी चित्रपटांना सुवर्णकमळासाठी फारशी वाट पाहावी लागली नाही. २०१२ साली उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ आणि २०१५ मध्ये चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटांना सुवर्णकमळ मिळाले. यंदाच्या वर्षी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला मिळालेले पाचवे सुवर्णकमळ ठरले आहे.

पुरस्कारांची यादी
चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव
मराठी चित्रपट – दशक्रिया
संकलन – व्हेंटिलेटर
अभिनेता – अक्षयकुमार (रुस्तम)
अभिनेत्री – सोनम कपूर (नीरजा)
हिंदी चित्रपट – नीरजा
दिग्दर्शक – राजेश मापुसकर (व्हेंटिलेटर)
विशेष उल्लेखनीय पुरस्कार – नीरजा
साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
पटकथा – दशक्रिया
सहाय्यक अभिनेत्री – झायरा वसीम (दंगल)
सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी (दशक्रिया)
सामाजिक चित्रपट – पिंक
व्हीएफएक्स – शिवाय
वेशभूषा – सायकल
फिल्म फ्रेंडली राज्य – उत्तर प्रदेश

आपली प्रतिक्रिया द्या