गुजरातेत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, काँग्रेसचा घोटाळ्याचा आरोप

29

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) घोटाळ्यांच्या तक्रारी गुजरात विधानसभा निवडणुकीतही कायम आहेत. मोबाईलमधील ब्लूटूथच्या सहाय्याने ‘ईव्हीएम’ कनेक्ट करून गडबड केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यावर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आणि तीन तासांतच ‘ईव्हीएम’ला क्लीन चिट देऊन आरोप फेटाळले. दरम्यान, गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील ८९ मतदारसंघांमध्ये आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सर्व २४,६८९ मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’मशीनद्वारेच मतदान झाले. व्हीव्हीपीएटी मशीनचाही वापर करण्यात आला. यापूर्वी ‘ईव्हीएम’बाबत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये काय होणार, याची उत्सुकता असताना पोरबंदर येथील मेमनवाडा येथे तीन मतदान केंद्रांवर ब्लूटूथच्या सहाय्याने ‘ईव्हीएम’ कनेक्ट केले जात आहे. ‘ईसीओ-१०५’ हे डिव्हाइस ब्लूटूथला कनेक्ट होते. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड केली जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते अरुण मोढवाडिया यांनी केली. ‘ईव्हीएम’मधील चिपला ब्लूटूथ कनेक्ट केले गेल्याचे निदर्शनास आले असे मोढवाडिया म्हणाले. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने येथील ईव्हीएम बदलले आणि चौकशीचे आदेश दिले होते.

आयोग म्हणते, आरोप बिनबुडाचा!
गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वाईन यांनी ‘ईव्हीएम’च्या मोबाईल कनेक्शनच्या चौकशीचे आदेश दिले आणि तीन तासांच्या आत काहीही घोटाळा झालेला नाही. काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. पोरबंदर येथील तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱयांना तेथे पाठविले होते. तक्रारदाराच्या ब्ल्यूटूथचे कनेक्शन ‘ईसीओ १०५’ बरोबर झाले. हा पोलिंग एजंटचा इंटेक्स कंपनीचा मोबाइल क्रमांक आहे. ईव्हीएमचा नाही, असा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. .

मतदानाची टक्केवारी घटली
८९ मतदारसंघांतील २४,६८९ मतदान केंद्रांवर आज मतदान झाले. सकाळी आठपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. मतदानाची टक्केवारी सुमारे ६८ टक्के असल्याचे आयोगाने म्हटले आहे. २०१२च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ७०.७५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी २.७५ टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. दरम्यान, १४ डिसेंबरला ९३ मतदारसंघांत मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा आहे.

सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री विजय रुपानी, काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया, शक्तिसिंह गोहेल यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
आता १४ डिसेंबरला मतदानाचा दुसरा टप्पा आहे. १८ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

नवसारी, मोरबीत सर्वाधिक मतदान
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी कच्छ-६३ टक्के, सुरेंद्रनगर – ६५, मोरबी – ७५, राजकोट – ७०, जामनगर – ६५, देवभूमी द्वारका -६३, पोरबंदर – ६०, जुनागढ-६५, सोमनाथ -७०, अमरेली -६७, भावनगर-६२, बोठाड-६०, नर्मदा – ६३, भरूच – ७१, सुरत – ७०, तापी – ७३, डांग – ७०, नवसारी – ७५, वलसाड – ७० टक्के.

आपली प्रतिक्रिया द्या