केंद्र सरकारमध्ये 7 लाख पदे रिक्त, बेरोजगारी वाढतेय, मोदी है तो मुमकीन है

480

देशातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस अधिक भयंकर बनत चालली आहे. तरुणाईने रोजगाराची अपेक्षा बाळगलेल्या मोदी सरकारकडूनच बेरोजगारीच्या समस्येची थट्टा चालवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारने आपल्या विविध विभागांत तब्बल 7 लाख पदे रिक्त असल्याचे स्वतःच गुरुवारी जाहीर केले.

देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे. रोजगाराचा बट्टय़ाबोळ उडाला आहे. त्यामुळे देशातील तरुणाई चिंतेत सापडली असतानाच गुरुवारी केंद्र सरकारने स्वतŠच रिक्त पदांचा खुलासा केला. हा तरुणाईच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ‘ग्रूप सी’अंतर्गत रिक्त पदांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या गटातील कर्मचाऱ्यांना दरमहा 9 हजार ते 34,500 रुपयांच्या आसपास वेतन मिळते. ‘ग्रूप सी’मधील रिक्त पदांची संख्या 5 लाख 75 हजारांच्या आसपास आहे. तसेच ’ग्रूप बी’मध्ये जवळपास 90 हजार तर ‘ग्रूप ए’मध्ये जवळपास 20 हजार पदे रिक्त असल्याचे सरकारने जाहीर केले. ही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आल्याचा दावाही सरकारने केला आहे.

रेल्वे, लष्करात रिक्त पदे अधिक

रिक्त पदांची सर्वाधिक संख्या रेल्वे प्रशासनात आहे. या विभागात जवळपास 2 लाख 50 हजार पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ लष्कराचा क्रमांक लागतो. लष्करातील रिक्त पदांची संख्या 1 लाख 90 हजार इतकी आहे. प्रत्येक विभागात अनेक पदे खाली असल्याचे सरकारच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

तरुणाईची निराशा

तरुणाईला रोजगाराचे गाजर दाखवून मोदी सरकार सत्तेत आले; मात्र सलग दुसऱयांदा केंद्रात सत्ता मिळवलेल्या या सरकारने तरुणाईची घोर निराशा केल्याचे वाढत्या बेरोजगारीवरून स्पष्ट झाले आहे. या समस्येवर काँग्रेसनेही चिंता व्यक्त केली आहे.

रिक्त पदे

  • ग्रूप सी – 5 लाख 75 हजार
  • ग्रूप बी – 90 हजार
  • ग्रूप ए – 20 हजार
आपली प्रतिक्रिया द्या