कर थकवणाऱ्या सात मालमत्ता सील, नाझ थिएटर, रिलायन्स आणि एचडीआयएल यांना दणका

57

सामना प्रतिनिधी । मुंबई

महानगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱया सात मोठय़ा मालमत्ता महापालिकेने सील केल्या आहेत. यामध्ये ग्रॅण्ट रोड येथील सुप्रसिद्ध नाझ थिएटरसह नेपियन सी रोडवरील ‘आशियाना’ इमारत, गोरेगाव परिसरातील रिलायबल बिल्डर्सचा मोकळा भूखंड, सनशाईन हाऊसिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांचा आरे रोड येथील मोकळा भूखंड, ‘एल’ विभागामधील ‘एचडीआयएल’ कंपनीची मालमत्ता अशा सात मालमत्तांचा समावेश आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय सील केल्यानंतर पालिकेने आता मोठमोठय़ा मालमत्ता व कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेली जकात रद्द झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते, मात्र गेल्या काही वर्षांत पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी तब्बल दहा हजार कोटींवर गेली आहे. यापैकी ज्या मालमत्ता कराबाबत कोणताही न्यायालयीन वाद नाही अशा रकमांची वसुली करण्यासाठी पालिकेच्या कर निर्धारण विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाधिक मालमत्ता कर थकबाकीदार असलेल्या १०० मालमत्ताधारकांची यादीही तयार करण्यात आली आहे. अशा मोठय़ा थकबाकीदारांवर पालिकेने आता मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत मार्च महिन्यात एकूण आठ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मालमत्तांचे मुख्य प्रवेशद्वार, काही ठिकाणी कार्यालय सील करण्यात आले असल्याची माहिती कर निर्धारण विभागाचे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांनी दिली.

३१ मार्च २०१८ पर्यंत पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट –
५ हजार ४०३ कोटी रुपये

आतापर्यंत जमा मालमत्ता कर –
३ हजार ८२० कोटी

या सात थकबाकीदारांवर करण्यात आली कारवाई
नेपियन सी रोडवरील ‘आशियाना’ इमारत – ७ कोटी ९९ लाख ६१ हजार ८२ रुपये
या इमारतीच्या ‘कार लिफ्ट’चा दरवाजा सील करण्यात आला आहे.

– ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील ‘नाझ सिनेमा’ (मे. माजदा थिएटर्स) – ४ कोटी १३ लाख १३ हजार ७६१ रुपये
भूखंडाचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर, गोरेगावमधील रिलायबल बिल्डर्स – ४ कोटी ६० लाख ९२ हजार २० रुपये
भूखंडाचा काही भाग सील करण्यात आला आहे.

आरे रोड परिसरातील ‘सनशाईन हाऊसिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ -४ कोटी ८ लाख १५ हजार १३८ रुपये
या भूखंडाचा मुख्य प्रवेश दरवाजा सील करण्यात आला आहे.

 ‘एल’ विभागातील मे. एचडीआयएल – ४ कोटी ४१ लाख ८३ लाख ४९९ रुपये
या भूखंडावरील ‘साइट ऑफिस’ सील करण्यात आले आहे.

 ‘एम पूर्व’ विभागातील देवनार इंडस्ट्रीयल प्रिमा. सह. सोसा. – २ कोटी १८ लाख ३३ हजार २६४ रुपये

या भूखंडावर जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे. –

खार परिसरातील १५व्या रस्त्यावर असणाऱया ट्विलाइट सोसा. – ९० लाख ७१ हजार ७३ रुपये
या भूखंडाचा मुख्य प्रवेश दरवाजा सील करण्यात आला आहे.

कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरा
– कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे.
– ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर न भरल्यास सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्प व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते.
– यानंतर २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ताधारकास दिली जाते.
– त्यानंतर मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग ‘सील’ करण्याची कारवाई केली जाते.
– मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाईदेखील केली जाते.
– शेवटी मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या