शिवसेनेमुळे मंडयांची सातपट भाडेवाढ टळणार; पालिका प्रशासनाचे सकारात्मक प्रतिसाद

लालबाग येथील महानगरपालिकेच्या सी.जे. शहा मंडईतील गाळेधारक आणि मच्छी मार्केटमधील गाळेधारकांचे 200 रुपयांपर्यंत असणारे भाडे थेट 1400 रुपयांपर्यंत – सात पट करण्यात आलेली भाडेवाढ अखेर रद्द होणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठोस आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणचे सर्वसामान्य गाळेधारक, कोळी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने 1 सप्टेंबर 2022पासून या गाळ्यांची अचानक भाडेवाढ केली. यावर पुन्हा दरवर्षी पाच टक्के अतिरिक्त भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने 200 रुपयांचे भाडे थेट 1300 ते 1400पर्यंत पोहोचवले. याबाबत कोळी महिला, गाळेधारकांनी शिवसेनेकडे गाऱहाणे मांडले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अजय चौधरी आणि विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सहआयुक्त रमेश पवार, मार्पेट विभागाचे सहाय्यक अभियंता रसाळ यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

आज तातडीची बैठक

शिवसेनेने अन्यायकारक भाडेवाढीबाबत प्रशासनाला माहिती दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. ही बाब गंभीर असल्याचे मान्य करत उद्या तातडीची बैठक घेऊन महापालिका आयुक्त प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याशी चर्चा करून भाडेवाढीबाबत निश्चितपणे पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी सांगितले.