बळींची संख्या ५६ वर, बिहारमध्ये ७० लाख लोकांना पुराचा फटका

24
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बिहारमधील नद्यांना महापूर आला आहे. या पुराचा फटका तब्बल ७० लाख ८१ हजार लोकांना बसला आहे. या पुराच्या तडाख्यात आतापर्यंत ५६ जणांचा बळी गेला आहे. पुराचा मोठा तडाखा कटिहार जिल्ह्यास बसला आहे. या जिल्ह्यात मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराच्या तीन तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यात अरिरिया जिल्ह्यात २०, किशनगंज ८, पूर्व चंपारण ३, पश्चिम चंपारण ९, दरभंगा ३, मधुबनी ३, सीतामढी ५, मधेपूर ४, शिव आणि शिवहर जिल्ह्य़ात पुरामुळे एकाचा बळी गेला आहे.

नेपाळमधील नद्यांमुळे पूरस्थिती गंभीर
बिहारबरोबरच नेपाळमध्येही सध्या तुफानी पाऊस होत आहे. यामुळे बिहारच्या सीमांचल भागात नेपाळमधून बिहारात येणाऱ्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. बिहारात किशनगंज, अररिया, पुर्णिया, कटिहार या चार जिल्ह्यांत पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. तसेच सुपौल, सहरसा, बगहा, गोपालगंज, मधुबनी, सीतामढी, खगडिया, दरभंगा आणि मधेपुरासह इतर अनेक जिल्ह्यांना पुराची झळ पोहचली आहे.

नेपाळमध्ये मुसळधार पावसाने ११५ ठार
काठमांडू : गेल्या पाच दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्या-नाल्यांना आलेला महापूर आणि दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत ११५ जणांचा बळी गेला आहे. या संततधार पावसाचा जबरदस्त फटका नेपाळमधील तब्बल ६० लाख लोकांना बसला आहे. नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी चीनने १ दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत चीनचे उपपंतप्रधान वांग यांग यांनी आज जाहीर केली.

आपली प्रतिक्रिया द्या