निवासी डॉक्टरांना पालिकेची सुरक्षा, पालिका रुग्णालयांत शनिवारपासून ७०० सशस्त्र सुरक्षारक्षक

19

सामना ऑनलाईन, मुंबई
निवासी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तब्बल ७०० सशस्त्र सुरक्षारक्षक देण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावे असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज केले. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांनी निर्भीडपणे काम करणे गरजेचे असल्याने त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवलीच पाहिजे असे महापौर म्हणाले.

शीव रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महानगरपालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी रविवारी सायंकाळपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले. रुग्णांचे हाल होऊ नयेत, त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.

दरम्यान, महापौरांच्या दालनात निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक झाली. या बैठकीत निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या महापौरांसमोर मांडल्या. महापालिकेचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे, सभागृह नेते यशवंत जाधव आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालकांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ७०० सशस्त्र सुरक्षारक्षक देण्याचे मान्य केल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांवर हल्ल्याची घटना घडल्यास अलार्म वाजवला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आंदोलन सुरू ठेवण्याचा डॉक्टरांचा निर्णय
महापौरांनी निवासी डॉक्टरांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या तरीही जोपर्यंत सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे. अनेकदा केवळ आश्वासनेच देण्यात आली परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप निवासी डॉक्टर शारोन सोनावणे यांनी केला तर भीतीच्या वातावरणात आम्ही काम करत असून आम्हाला कडक सुरक्षाव्यवस्था पुरवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. एच. आर. नंदेश यांनी सांगितले.

प्रवेश पासाशिवाय रुग्णालयात येणाऱयांवर गुन्हा
प्रवेश पासाशिवाय रुग्णालयात प्रवेश करणाऱया नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका रुग्णालयांमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत आज उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेतला गेला. सर्व रुग्णांना एक प्रवेश पास आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन प्रवेश पास देण्यात येणार आहेत.

कठोर केंद्रीय कायदा करा!
डॉक्टरांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केली. केंद्र सरकारने यासंदर्भात स्थापन केलेल्या मंत्रीगटाने अत्यंत कठोर अशा केंद्रीय कायद्याची शिफारस केली आहे. त्यामुळे तातडीने अशा प्रकारचा कायदा संमत करावा अशी मागणी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या