जयोस्तुते… स्वतंत्रते!

526

>>दिलीप जोशी<<

[email protected]

१९७२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये होतो. हिंदुस्थानात नुकतीच होत असलेली हरित क्रांती आणि बांगलादेशचा विजय अशा घटनांनी तरुणवर्ग उत्साहित झाला होता. देश एक महासत्ता व्हावा यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रयत्न सुरू होते. इंदिराजींच्या कारकीर्दीची ती खऱ्या अर्थाने सुरुवात होती. ‘गरीबी हटाव’ची घोषणा प्रत्यक्षात उतरेल असा आशावाद निर्माण झाला होता. रेडिओवर रोज सकाळी एक गाणे वर्षभर वाजत होते, ‘वाजे विजय तुतारी रे। बांधा तोरण दारी रे।। रजत जयंती स्वातंत्र्याची। दुमदुमते ललकारी रे।। चला रे घुमवा जयजयकार। भारत माझा।।’

आता देश तेजाने तळपणार असं वाटत असतानाच कुठेतरी ग्रहण लागलं. कारणांची चिकित्सा नंतर पुष्कळ झाली. १९७२ नंतरचे दुष्काळ, बेकारी, बऱ्याच गोष्टी. त्यातच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वाकडं गेलं. बघता बघता सगळय़ांच क्षेत्रांतील ‘विजय तुतारी’चे सूर मंदावले. अगतिक इंदिरा गांधींनी देशात अंतर्गत आणीबाणी लादली आणि अठरा महिन्यांकरिता देशातील जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच झाला. तोपर्यंत पत्रकारितेची सुरुवात झालेल्या आमच्यासारख्यांना वृत्तपत्राच्या ‘सेन्सॉर’कडे जावं लागत होतं. असं घुसमटलेलं जिणं स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या टिळक-गांधींना आणि संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीच अपेक्षित नसेल. पण तसं विपरीत घडलं खरं. अर्थात १९७७च्या निवडणुका इंदिरा गांधींनीच घेतल्या आणि पराभव स्वीकारला याचं श्रेय आपल्या जागृत जनतेला द्यायला हवं. ‘जनता’ सरकारच्या ‘खिचडी’चा प्रयोग फसला आणि इंदिराजी पुन्हा सत्तेवर आल्या. ‘जनता’ सरकार आल्यापासून देशातला काँग्रेसचा एकछत्री अंमल संपला. कधी सर्वंकष जनता सरकार तर कधी डावेप्रणीत आघाडय़ा आणि आता संपूर्ण भाजप इथवर हा प्रवास झाला आहे. ज्योती बसूंना पक्षाने पंतप्रधानपद स्वीकारू दिलं असतं तर देशाने कम्युनिस्ट प्रधानमंत्रीही पाहिला असता.

आज देशाच्या स्वातंत्र्याची सत्तरी पूर्ण होत आहे. १९४७ पासूनच्या सात दशकांत आपण कुठे आहोत याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘इस्रो’ पराक्रम करीत आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या यशपाल यांच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांनी आधुनिक हिंदुस्थान घडवायला मदत केली आहे. संरक्षण सिद्धतेमध्येही आपण सक्षम आहोत. मात्र पाकिस्तानी कुटील कारवायांबरोबरच आता चिनी ड्रगन विषारी फूत्कार टाकू लागला आहे ही गंभीर गोष्ट आहे.

केवळ पावसावर अवलंबून आणि आपल्या देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या शेतीच्या बाबतीत मात्र हरित क्रांतीने आणलेली टवटवी कोमेजते की काय अशी अवस्था दिसतेय. हताश शेतकरी हे चित्र कोणत्याही सरकारला भूषणावह नाही. बदलतं जागतिक हवामान आणि आपली शेती यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून शेतीविषयक जाणीव शहरी जनतेतही निर्माण होईल यासाठी सरकारी, स्वयंसेवी अशा सर्वच स्तरांवर प्रयत्न झाले पाहिजेत.

शिक्षणाच्या बाबतीत अनागोंदी आणि पाच वर्षांच्या मुलांच्या डोक्यावर पाच किलोचं पुस्तकांचं ओझं असेल तर ते भारंभार ज्ञानाचं लक्षण नव्हे हे राज्यकर्त्यांसह सर्वांनाच समजायला हवं. कमालीची विविधता असलेल्या देशातील एकता टिकवायची तर नव्या पिढीला, निरोगी विचारांचा, सर्वसमावेशकतेचा, जागतिक भान ठेवून देशाविषयीची कळकळ निर्माण करणारा संदेश मिळायला हवा. परीक्षार्थी निर्माण करणाऱ्या शिक्षणात जीवनमूल्यांचं शिक्षण असतं का, असा प्रश्न पडल्यावर गुरुदेव टागोरांनी ‘शांतिनिकेतन’मध्ये  ‘विश्वभारती’ विद्यापीठ सुरू केलं होतं. त्यानंतर काळ खूपच बदलला आहे. जगातलं नवं तंत्रज्ञान आता लगेच उपलब्ध होतंय. नवी पिढी ‘अलम दुनियेशी ‘कनेक्ट’ होतेय.’ ते होत असताना इथल्या मूलभूत प्रश्नांबाबत ती डिस्कनेक्ट होऊन उदासीन झाली तर काही खरं नाही. व्यक्तिगत धनाढय़ता त्यातून येईलही, पण जबाबदार नागरिक म्हणून विचार करण्याची क्षमता?

ऊर्जा, आरोग्य याबाबतचे प्रश्नही उग्र झाले आहेत. विस्कळीत तरीही बराच पाऊस पडणाऱ्या देशाला पाण्याची टंचाई का असावी? सिंगापूरसारखा छोटा देश कचऱ्यातून वीज निर्माण करून ‘स्वच्छ’ होऊ शकतो, तर आमच्याकडेच डम्पिंग ग्राऊंडची दुर्गंधी  का पसरावी? तत्त्वतः मान्य केलेली सामाजिक समता मृगजळाप्रमाणे का भासावी? राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीची मरगळ की नियोजनशून्यतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराचा प्रभाव? स्वातंत्र्यलढय़ात उतरलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना १९९२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने भेटलो होतो. अगदी सुभाषबाबूंच्या सैन्यात कर्नल असलेल्या लक्ष्मी सहगल यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये भाग घेतलेले आणि गांधीजींच्या प्रभावाने अहिंसक आंदोलनाला सर्वस्व अर्पण केलेले स्वातंत्र्यसैनिक ऑगस्ट क्रांती मैदानावर जमले होते. पुण्यात बाबूराव भाटवडेकरांनी सांगितलेली भगतसिंग, राजगुरू यांच्या प्रत्यक्ष भेटीची गोष्ट मनात होती. त्या भारावलेल्या वातावरणात आपल्याला रुचेल त्या मार्गाने, मनात स्वार्थ तर सोडाच, पण प्राणांचीही पर्वा न करता ती मंडळी झुंजली होती. पण तेव्हाही त्यांच्या डोळय़ात दिसणारी ‘याचसाठी केला होता अट्टहास?’ अशी खंत घायाळ करणारी होती. स्वातंत्र्याला सत्तर वर्षे पूर्ण होताहेत. सावरकरांच्या शब्दांत ‘स्वतंत्रते’ला ‘जयोस्तुते’ म्हणताना प्रत्येकाने आपल्यापुरतं योगदान देण्याचा संकल्प केला तरी देश उजळून निघेल.

आपली प्रतिक्रिया द्या