National Film Awards – राष्ट्रीय पुरस्कारावर उमटली वाळवी चित्रपटाची मोहोर; ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठत समजल्या जाणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत विजेत्यांची नावे घोषित केली. या पुरस्कारांमध्ये पुन्हा मराठीचा झेंडा फडकलेला पाहायला मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर ‘वारसा’ या चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.

या चित्रपटांसोबतचं अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच हिंदी चित्रपट श्रेणीमध्ये मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर अभिनीत ‘गुलमोहर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

 त्याचबोराबर अट्टम या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मल्याळम फिचर चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले असून, ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ‘तिरूचित्रंबलम’ या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारेख यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.

या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण ऑक्टोबर 2024 मधे केले जाणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.