स्वच्छता अभियान फक्त कागदावरच, ७३ कोटी जनतेकडे शौचालयच नाही!

26
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला तीन वर्ष झाली असली तरी अद्याप हे अभियान फक्त कागदावरच असल्याचे उघडकीस आले आहे. हिंदुस्थानात आजही तब्बल ७३ कोटी जनता उघड्यावरच शौचाला जात असल्याचे एका सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद केले आहे. वॉटर ऐड स्टेट ऑफ द वर्ल्ड टॉयलेट २०१७ ने १९ नाव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या टॉयलेट दिनानिमित्त जगभरात सर्वेक्षण केले असून त्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर आहे तर चीन पहिल्या स्थानावर. मात्र कमी शौचालयांच्या बाबतीत हिंदुस्थानने चीनला मागे टाकले आहे. हिंदुस्थानात आजही ७३ कोटी जनतेपर्यंत शौचालयासारखी मुलभूत सुविधाही पोहोचली नसल्यामुळे त्यांना या विधी उघड्यावरच उरकाव्या लागत आहेत. या ७३ कोटीत ३५ कोटी महिला आहेत. कमी शौचालयांच्या बाबतील हिंदुस्थानचा जगभरात पहिला क्रमांक लागतो. हिंदुस्थान पाठोपाठ चीन दुसऱ्या स्थानावर असून चीनमध्ये ३४ कोटी जनतेकडे शौचालय नाहीत.

हिंदुस्थानात स्वच्छता मोहिम राबवली जात असली तरी देशातील कानाकोपऱ्यात ही मोहीम पोहचायला बराच काळ लागणार आहे. अद्याप ७३ कोटी जनता शौचालयाअभावी उघड्यावर शौचाला बसते तर अनेक भागांत शौचालय असूनही तिथे पाण्याअभावी स्वच्छता ठेवली जात नसल्याने अनेकजण त्या शौचालयांचा वापर टाळतात. असे या अहवालात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या