पहिल्या यादीत नाव असलेल्या 73 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ

89

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या यादीत नाव आलेल्या मुंबई विभागातील 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 72 हजार 361 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेतलाच नाही. यातील ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले होते असे विद्यार्थी पुढील प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले असून अन्य पसंतीक्रम नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱया यादीत प्रवेशाची पुन्हा संधी मिळणार आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीनंतर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्याची मुदत मंगळवारी संपली. दिलेल्या मुदतीत मुंबईतील केवळ 61 हजार 645 विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या यादीसाठी 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. मुंबईसह इतर विभागांतही पहिल्या यादीतील प्रवेशाकडे पाठ फिरविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांच्या दुसऱया गुणवत्ता यादीत विचार होणार आहे. दुसरी गुणवत्ता यादी 22 जुलैला जाहीर होणार असून तत्पूर्वी दुसऱया यादीसाठी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होणार आहे.

461 विद्यार्थ्यांचे अर्ज बाद
मुंबई विभागातील 88 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज रद्द केला तर 373 विद्यार्थ्यांचे अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे 461 विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले आहेत. प्रवेश न घेतलेल्या 72 हजार विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांना वरच्या पसंतीक्रमाच्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीत मिळालेला प्रवेश घेतला नसल्याची शक्यता आहे. – राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, मुंबई

1 लाख 24 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
मुंबई विभागातील 1 लाख 23 हजार 371 विद्यार्थी अद्याप अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा 1 लाख 85 हजार 477 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केला होता. यांपैकी पहिल्या यादीत 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यांपैकी 51 हजार 010 विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आलेले नाही. पहिल्या यादीतील 72 हजार 361 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याने एकूण 1 लाख 23 हजार 371 विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या