महाराष्ट्रात रॅगिंगने सात वर्षांत घेतले ८ बळी, राज्यात ४८ घटनांची नोंद

सामना प्रतिनिधी । मुंबई

सन २००७ ते २०१३ या सात वर्षांच्या काळात राज्यात रॅगिंगने आठ जणांचे बळी घेतल्याचा धक्कादायक अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) दिला आहे. या कालावधीत देशात रॅगिंगच्या ७१७ घटनांची नोंद झाली. त्यातील ४२ घटना महाराष्ट्रात घडल्या होत्या असे अहवालात म्हटले आहे.

रॅगिंगमागची मानसिकता जाणून घेण्यासाठी यूजीसीने चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल यूजीसीला सादर केला. दि कोएलिशन टू अपरूट रॅगिंग फ्रॉम एज्युकेशन (क्युअर) या स्वयंसेवी संस्थेच्या आकडेवारीचाही त्यात समावेश आहे. देशात २०१३ पर्यंतच्या सात वर्षांत घडलेल्या रॅगिंगच्या ७१७ घटनांपैकी ७१ घटनांमध्ये संबंधितांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील ६ महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या घटना नोंदल्या गेल्या.

रॅगिंगचे परिणाम – घटना

 • लैंगिक अत्याचार – १२८
 • दोन गटांत हाणामारी – १२९
 • मद्यपान, धूम्रपान सक्ती – ३५
 • जातिवाचक – २५

अशी झाली रॅगिंग…

 • वरिष्ठ विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख करून देणे ५३.३ टक्के
 • वरिष्ठ विद्यार्थ्यांना सर/मॅडम बोलायला लावणे ३२.५ टक्के
 • ड्रेस कोडची सक्ती २३.५ टक्के
 • गाणे म्हणणे आणि नाचण्याची जबरदस्ती २४.२ टक्के
 • अनोळखी विद्यार्थ्यांना प्रपोझ करणे ८.८ टक्के
 • मद्यपान आणि धूम्रपान ३ टक्के
 • वरिष्ठांना पैसे द्यायला लावणे ३.१ टक्के
 • मारहाण करणे, शिक्षा देणे ४.२ टक्के
 • अश्लील भाषा वापरणे १०.८ टक्के
 • लैंगिक हालचाली १.४ टक्के
 • अन्य ०.९ टक्के

रॅगिंग रोखण्यास यूजीसीच्या शिफारशी

 • नवीन विद्यार्थ्यांसाठी स्वागत कार्यक्रम आयोजित करावा.
 • रॅगिंगची शक्यता असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
 • रॅगिंग केल्यास काय कारवाई होईल याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.
 • रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करावे.