ठाण्यात पावसाचे आठ बळी

24

सामना ऑनलाईन । ठाणे / पालघर

मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने ठाणे, पालघरमध्ये आठ बळी घेतले. ठाण्यात नाल्यामध्ये चार वर्षीय चिमुरडीसह पाचजण वाहून गेले असून चारजणांचे मृतदेह सापडले आहे. पालघरमधील वाघोबा खिंडीतही एक पाच वर्षीय बालिका वाहून गेली असून खड्डय़ांमुळे एका बाईकस्वाराला जीव गमवावा लागला तर विरारमध्ये एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

मुसळधार पावसामुळे ठाण्यात आलेल्या पुरामध्ये इंदिरानगर येथील नाल्यामध्ये चार वर्षीय गौरी जयस्वार नावाच्या चिमुरडय़ा मुलीसह एक तरुण नाल्यात पडला. त्यापैकी शाहिद शेखचा मृतदेह सापडला असून गौरीचा शोध सुरू आहे. कळवा येथेही 32 वर्षीय रंजिता शेखचा मृतदेह सापडला आहे तर आज सकाळी केव्हिला येथे एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून आनंद नगर येथे राहणारे गंगाराम बालगुडे यांचा नाल्यात पडून मृत्यू झाला. पुरात वाहून जाणारा ड्रम वाचवण्याच्या नादात त्यांचा तोल गेला व ते नाल्यात पडले. त्याचवेळी नाल्यामुळे आलेल्या भोवऱयामध्ये ते अडकले.

पालघर-मनोर रोडवरील वाघोबा खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. दरड कोसळल्याने पाण्याचा प्रवाह एका बाजूने जोरात झाल्याने पालघरकडे येणाऱया राम बालसी त्याची पत्नी व मुलगी कनिष्का ( 5 )यांची मोटरसायकल पाण्यात वाहून गेली. राम बालसी व त्यांच्या पत्नीला वाचवण्यात नागरिकांना यश आले. मात्र त्यांची मुलगी कनिष्का वाहून गेली. तर बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डय़ांचा अंदाज न आल्याने जितेंद्र शर्मा या बाईकस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. विरार येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सुरेश प्रजापती या तरुणाला जीव गमवावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या