अंबरनाथ: बोगस कॉल सेंटर प्रकरणी ८ जणांना अटक

25

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

सहा हजार डॉलरचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अमेरिकेतील नागरिकाची फसवणूक करणाऱ्या अंबरनाथमधील बोगस कॉल सेंटरचे पितळ ठाणे पोलिसांनी उघड केले असून याप्रकरणी आठजणांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी मिरारोड येथे सागर ठक्कर याने अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली होती. मात्र, या प्रकरणाचा सागर ठक्करशी संबंध आढळला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथ येथील रमेश एन्टरप्राईजेस या इमारतीत ‘माऊंट लॉजिक सोल्युशन्स’ या नावाने २०१५ पासून बोगस कॉलसेंटर सुरू होते. अमेरिकेतील नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा यासाठी येथील प्रत्येक कर्मचाऱ्याला अमेरिकेतील नागरिकांप्रमाणे संभाषण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. इंटरनेटच्या ‘व्हॉईस ऑडिओ इंटरनेट प्रोटोकॉल’च्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून ‘आम्ही कोलंबस बँकेतून बोलत असून, आपल्याला सहा हजार अमेरिकन डॉलर इतके कर्ज देत आहोत, असे सांगितले जात होते. नंतर अमेरिकेतील व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण, त्याची आर्थिक कुवत आदी माहिती मिळवून कर्जाच्या प्रक्रियेसाठी १०० ते ५०० डॉलर फी असल्याचे सांगितले जात होते. सर्व पैसे आयट्युन कार्डद्वारे स्वीकारले जात. नंतर आयट्युन कार्डचा १६ आकडी क्रमांक कॉल सेंटरचे कर्मचारी व्यवस्थापनाला देत.

आयट्युन कार्डद्वारे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात देवश येरलेकर, सचिन चिंचोळकर, गुरू श्रेयन या प्रमुख आरोंपींसह प्रमोद दिनकर, वसीम शेख, मोहन कुलकर्णी, शरण राव, रोहन गेडाम या आठजणांना अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपींचे शिक्षण १२ पर्यंतचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ३१ संगणकाच्या हार्ड डिस्क, ३ लॅपटॉप आणि बरीच कागदपत्रे जप्त केली आहेत. कॉल सेंटरशी संबंधित १८ जणांची चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या