गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गोळीबार, अधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू

919

उत्तरप्रदेशात नामचिन गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अंधाधुद गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक पोलीस उपअधिक्षक, तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. भयंकर चकमकीत आठ पोलीस कर्मचारी शहीद झाल्याने देशभरात खळबळ उडाली असून, उत्तरप्रदेशातील कायदा-सुयवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खुन, अपहरण, दरोडा, खुनाची सुपारीसह तब्बल 60 गंभीर गुन्हे असलेला गुंड विकास दुबे पोलिसांच्या हिटलिस्टवर होता. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. विकास दुबे हा कानपूरनजीकच्या बिकरू गावात असल्याची माहिती पोलिसांना गुरूवारी रात्री मिळाली. पोलीस उपअधिक्षक देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक मध्यरात्री बिकरू गावात पोहचले आणि भयंकर घटना घडली.

रस्ता अडवला; घराच्या टेरेसवरून गोळीबार
पोलिसांचे पथक गावात येणार याची खबर आधीच दुबे गँगला मिळाली होती. जेसीबीने रस्ता उखडून टाकला होता. त्यामुळे पोलिसांची गाडी विकास दुबेपर्यंत पोहचू शकली नाही आणि भयंकर घटना घडली. दुबेचे गुंड घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते. पोलीस पथकावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. उपअधिक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह उपनिरीक्षक महेश चंद्र यादव, अनुपकुमार सिंह, निबूलाल आणि कॉन्स्टेबल जितेंद्र पाल, सुलतान सिंह, बबलू कुमार आणि राहुल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. दोन उपनिरीक्षक, तीन कॉन्स्टेबल, एक होमगार्ड आणि एक नागरिक जखमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या