मराठवाडय़ात दर महिन्याला ८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

15
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कर्जमाफीमुळे पीककर्जच देण्यात आले नाही. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली. त्यामुळे गेल्या १० महिन्यांत मराठवाडय़ामध्ये कर्जमाफीची वाट पाहून थकलेल्या ८०० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. दर महिन्याला ८० शेतकरी मरणाच्या दारात जात होते आणि सरकार नावाची यंत्रणा अजगरासारखी सुस्त पडून होती!

निसर्गाच्या लहरीपणाचा मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. मागच्या पाच वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांत पावसाने दिलासा दिला. जरा कुठे परिस्थिती अनुकूल होत असतानाच नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ जीएसटीचे संकट आदळले. यामुळे शेतकरी आणि शेतीव्यवसायच आतबट्टय़ात आला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी शिवसेनेने आवाज उठवला. त्यानंतर ढिम्म असलेल्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. ऑनलाइन-ऑफलाइनच्या घोळात ही कर्जमाफी अडकली. कर्जमाफी झाल्यामुळे बँकांनी पीककर्ज देण्यास हात आखडता घेतला. यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी पुरता संकटांच्या दलदलीत फसला. कर्जमाफीचा लाभ मिळत नाही आणि पीककर्जासाठी बँका उभे करत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली. अशा दोलायमान अवस्थेत मराठवाडय़ात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या काळात तब्बल ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक १६७ आत्महत्या रेकॉर्डब्रेक पाऊस झालेल्या बीड जिल्हय़ात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ नांदेड जिल्हय़ात १२४ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या.

१५५ आत्महत्या शासन मदतीस अपात्र

मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. विभागात १० महिन्यांत झालेल्या ८०० आत्महत्यांपैकी १५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासन मदतीस अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. शिवाय ७४ प्रकरणे अद्याप चौकशीत प्रलंबित आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मिळते की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सहा शेतकऱयांनी मागितली आत्महत्येची परवानगी

राहाता – नगर जिल्हा सहकारी बँकेच्या बालिशपणामुळे नाबार्डच्या व शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पिंपरी निर्मळ येथील सहा शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडे आत्महत्येची परवानगी मागितल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कैलास धोंडिराम घोरपडे, अनिता कैलास घोरपडे, जगन्नाथ भीमराज घोरपडे, शोभा बाबासाहेब निर्मळ, नानासाहेब शिवराम राऊत, नाना सखाराम घोरपडे या शेतकऱ्यांनी आत्महत्येसाठी परवानगी मागितली आहे.

जिल्हानिहाय आत्महत्या

संभाजीनगर १०८

जालना  …… ७१

परभणी ….. १०९

हिंगोली …… ४३

नांदेड  …… १२४

बीड ……..  १६७

लातूर ……… ७६

धाराशीव… १०२

एकूण …. ८००

आपली प्रतिक्रिया द्या