एलएलएम सेमिस्टर एकमध्ये 80 टक्के विद्यार्थी नापास

150
exam-papers
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एलएलएम सेमिस्टर एकच्या निकालाने विद्यार्थ्यांना जबरदस्त झटका बसला आहे. कारण या निकालात तब्बल ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना नापास केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. पात्रता नसलेल्या शिक्षकांकडून पेपर तपासल्यामुळेच हा घोळ झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून याविरोधात दाद मागण्यासाठी ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएमच्या सेमिस्टर-१ ची परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा निकाल गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अनेक वेळा पत्रव्यवहारदेखील केला होता. त्यानुसार अखेर दोन दिवसांपूर्वी एलएलएमचा निकाल जाहीर करण्यात आला, मात्र या निकालात ७० ते ८० टक्के विद्यार्थी नापास झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच या मुलांना पुनर्मूल्यांकनांसाठी अर्ज करायचा की नाही याबाबत प्रश्न सतावत आहेत. या मुलांची परीक्षा ५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याने इतक्या कमी वेळेत पूनर्मूल्यांकनाचा निकाल येणे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुनर्मूल्यांकनाची संधीही नाही!
या निकालावर आक्षेप नोंदविताना स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात मुले नापास कशी काय होऊ शकतात. या निकालाची चौकशी करण्याची मागणी लवकरच विद्यापीठाकडे करणार आहोत. तर निकाल उशिराने जाहीर केल्याने पुनर्मूल्यांकनाची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याने त्याचा अप्रत्यक्षरीत्या फटका विद्यार्थ्यांनाच बसणार असून ५ एप्रिलपासून होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे. या निकालासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या