डीडी बनविण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांना ८३ लाखांचा गंडा

166

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

व्यापाऱ्यांना देण्यासाठी डी.डी. बनविण्याची थाप मारून जळगावातील तीन व्यापाऱ्यांना तब्बल ८३ लाख १५ हजारांचा गंडा घालणाऱ्या गुलमंडीवरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पतसंस्थेच्या ८ संचालकांवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माजी संचालक चंद्रकांत बकतुलवार यास अटक केली. न्यायालयाने त्यास १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जळगाव, गायत्रीनगरातील जयपालदास गिरीधारीलाल साहित्या (६१) हे कपड्याचे प्रसिद्ध ठोक व्यापारी आहेत. नोव्हेंबर २०१६ ला दिवाळीनंतर जयपालदास हे त्यांच्या मुलासोबत मराठवाडा तसेच नाशिक, धुळे, नगर येथील व्यापाऱ्याकडून जमा केलेली ६० लाखांची रक्कम घेऊन आले. जवाहरगनर परिसरातील त्रिमूर्ती चौकातील शिवदास ट्रेडर्स सेंटर येथून त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे शाखा व्यवस्थापक रवींद्र जेसू जाधव यांच्याशी संपर्क साधला. या सोसायटीचे मुख्य कार्यालय लातूर असून, त्यांच्या नगर येथेही शाखा आहेत. संभाजीनगरचे व्यवस्थापक रवींद्र जाधव आणि जनरल मॅनेजर चंद्रकांत बकतुलवार यांना ५३ लाख ४० हजारांची रक्कम दिली. डी.डी. बनविण्यासाठी सोबत १२६ व्यापाऱ्य़ांची नावेही दिली. पैसे घेतल्यानंतर जाधव आणि बकतुलवार यांनी दोन दिवसांत डी.डी. बनवून देण्याची थाप मारली.

ठरल्याप्रमाणे जयपालदास यांनी दुसऱ्या दिवशी डी. डी.बाबत विचारणा केली असता दोघांनी तुमचे पैसे लातूर येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यात आले असून, डी.डी. येण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागेल, अशी थाप मारत वेळ मारून नेली. जयपालदास यांना तब्बल दीड वर्ष ते थापा मारत असल्याने त्यांनी आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सखोल चौकशी करून तत्कालीन व्यवस्थापक चंद्रकांत बकतुलवार, रवींद्र जेसू जाधव, विजय त्र्यंबकराव केंद्रे भुजंगे पवार, प्रमोद बालाजी निमसे, गणेश थोरात व लातूर व नगरचे संचालक मंडळाविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चंद्रकांत बकतुलवार यास अटक केली. न्यायालयाने त्यास १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दहा दिवसांनंतर डी.डी. ऐवजी दिला चेक

सावरकर क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आणि नगर तसेच लातूर येथील संचालक मंडळाने साहित्या यांच्यासह कैलास मनोहरलाल दलवाणी यांच्याकडून २५ लाख ३७ हजार २५० व रोशन मुलचंद जैसवानी यांचे ४ लाख ३७ हजार ८०० अशी एकूण ८३ लाख १५ हजारांची रक्कम डी.डी. देण्याची थाप मारून उकळली. नियमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी डी.डी. न देता या टोळक्याने तब्बल दहा दिवसांनंतर डी.डी. ऐवजी लातूर येथील अ‍ॅक्सिस बँकेचे १२६ चेक दिले. हे चेक वटतील, अशी हमी दिल्याने साहित्या यांनी चेक व्यापाऱ्यांना दिले. चेक न वटल्याने सोसायटीचे बिंग फुटले. दीड वर्ष सतत टाळाटाळ केल्यानंतर साहित्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

आपली प्रतिक्रिया द्या