’83’मधल्या आणखी एका खेळाडूचा लूक झाला जाहीर, वाचा कोण आहे तो खेळाडू?

1522

हिंदुस्थानच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. 83च्या विश्वचषक संघातल्या खेळाडूंच्या रुपात कलाकारांना पाहण्याची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. ती उत्सुकता आता शमण्याची चिन्हं आहेत.

अर्थात 83चा नायक कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीर सिंगचा फोटो याआधीच प्रसिद्ध झाला आहे. पण, इतर भूमिकांमधील कलाकारांबाबत उत्सुकता कायम होती. पण, आता हळूहळू एकेक भूमिका उलगडताना दिसत आहे. शनिवारी लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या रुपातील ताहीर राज भसिन याचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रविवारी या विश्वविजेत्या संघातील आणखी एका खेळाडूचा लूक प्रदर्शित झाला आहे. कृष्णनामाचारी श्रीकांत यांच्या भूमिकेतला हा फोटो असून यात दाक्षिणात्य अभिनेता जीवा दिसत आहे. अमर चौधरी असं खरं नाव असलेल्या जीवाने आतापर्यंत तमीळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो 83 द्वारे हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात ताहीर भसीन, साकिब सलीम, अॅम्मी विर्क, जीवा, साहिल खट्टर, धैर्य करवा, दिनकर शर्मा, जतीन सारना, हॅरी संधू, आर. बद्री, पंकज त्रिपाठी अशी स्टारकास्ट असणार आहे. तसेच आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे दोन मराठमोळे कलाकारही या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रणवीर सिंग याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या