१७ लोकसभा निवडणुकींपैकी १६ निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बोडस आजी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीतील ८३ वर्षांच्या सुमित्रा बोडस आजींनी १७ लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल १६ लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर उपस्थित राहून बोडस आजीनी मतदान केले. त्यानंतर दैनिक ‘सामना’शी बोलताना त्यांनी १९५२ पासून म्हणजे पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनचे अनुभव सांगितले.

१९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी मतदानासाठी वयाची अट २१ वर्ष होती. त्यामुळे पहिल्या निवडणुकीत सुमित्रा बोडस यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता मात्र त्यांचे आजोबा नानासाहेब देवगिरीकर हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे मतदानाचा हक्क मिळाला नसला तरी पहिल्या निवडणुकीत सुमित्रा बोडस प्रचारात सहभागी झाल्या.१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीपासून ते आज १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सलग सोळा वेळा त्यांनी मतदान केले.

सुमित्रा बोडस म्हणाल्या की, प्रचार हा मतदानापर्यंत सुरुच असायचा. अलीकडे मतदानाच्या आधी एक दिवस प्रचार बंद होतो. पण त्याकाळात मतदानाच्या दिवशी गाठीभेटी होत असतं. तेव्हा प्रचाराने भिंती रंगत, कर्ण्यावरून प्रचार करत. आज ते दिसतं नाही, असं त्या सांगताना आणीबाणी नंतर निवडणुकांचे स्वरुप बदलत गेले. त्यानंतर विशेष म्हणजे शेषन यांनी निवडणूक प्रक्रियेत बदल केले. पूर्वी निवडणुका सुटसुटीत असायच्या. नियम वगैरे फार नसतं. कारण माझे आजोबा बारा वर्ष खासदार होते. त्यामुळे निवडणुकीशी आमचा थेट संबंध येत होता, असे त्या आवर्जून सांगतात.

तब्बल ३५ वेळा मतदान
आजकाल प्रशासनाला मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन करत बोंबलत फिरावं लागते. अशावेळी ८३ व्यावर्षी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बोडस आजींचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. सुमित्रा बोडस यांनी आता पर्यंत १६ लोकसभा, १२ विधानसभा आणि शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या ७ विधानपरिषद निवडणुका अशा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ३५ निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. बोडस आजींना वाऱ्याची दिशा चांगली कळते कारण माझं एकही मत आतापर्यंत फुकट गेले नाही, असे त्या मिश्किलपणे सांगतात. त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा पायंडा आपल्या तिसऱ्या पिढीत रूजवला आहे. त्यांनी त्यांचे पुण्यात शिकणारे नातू यशराज आणि मैत्रेय यांना मतदानासाठी रत्नागिरीत बोलावून घेतले आणि तीन पिढ्यांनी म्हणजे आजी, मुलगा, सून आणि नातवंडे यांनी एकत्र जाऊन लोकशाहीच्या उत्साहात सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला.