एक भूखंड 22 जणांना विकला, 84 वर्षांच्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमधील मोक्याच्या ठिकाणी असलेला एक भूखंड 20 वर्षापूर्वी तब्बल 22 जणांना विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झुमकाजी नरबाजी परणकर (84) असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच झुमकाजी याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

शहरातील साई मंदिर रस्त्यावरील गट क्रमांक 35 मध्ये दीड हेक्टर जमिनीवरून कासलीवाल आणि परणकर कुटूंबीयांसह तोष्णीवाल बंधूमध्ये दिवाणी खटला सुरू होता. न्यायालयातील प्रक्रियेच्या 13 सप्टेंबर 1989 ते 1 फेब्रुवारी 1990 दरम्यान झुमकाजी याने सुभाष नारायण तोष्णीवाल यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे खोटे ठसे घेऊन एकच भूखंड जवळपास 22 जणांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड झुमकाजी परणकर याने शोभादेवी मोदी, सविता गट्टेवार, हिरादेवी कासलीवाल, अब्दुल खान, लता गट्टेवार, निवृत्ती भोसले, डॉ. इंदिरा मुंदडा, राजेश मेहता, झुंबरलाल गिल्डा, बसंतादेवी साबु, शारदादेवी नंदलाल लोहिया, असा 22 लोकांनी विकल्याचे प्रकरण जवळपास 20 वर्षानंतर समोर आल्याने नांदेडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या