जालन्यात रासायनिक खत व दूषित पाण्यातून विषबाधा, 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू

रासायनिक खत व दूषित पाण्यातून विषबाधा होवून 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालन्यातील भोकरदनमध्ये घडली आहे. राजुर येथील चांदई एक्को रोड परिसरात 26 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तब्बल 13 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

मेंढपाळ बाळू शिंगाडे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी तालुक्यातील धनगर समाज बांधवांसह विविध संघटनांनी केली आहे. नाशिकमधील नांदगाव तालुक्यातील टाकळी येथील मेंढपाळ बाळू शिंगाडे, भावराव शिंगाडे हे राजुरजवळील चांदई एक्को रस्ताच्या कडेला मोकळ्या जागेत मेंढ्या चारत होते.

दरम्यान, मेंढ्यांनी खोलगट स्थळी साचलेले रासायनिक खताचे विषारी पाणी पिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे 15 ते 20 मिनिटात मेंढ्या जमिनीवर कोसळल्या. या दुर्देवी घटनेत तब्बल 86 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच राजूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वसमतकर, डॉ. रविंद्र जायभाये, डॉ. वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेवून बाधित मेंढ्यांवर तातडीने उपचार करायला सुरुवात केली. सहा मेंढ्यांना डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे.

मेंढपाळ बाळू शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कळपात एकूण 200 मेंढ्या
होत्या. त्यापैकी 86 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात काही मेंढ्यांच्या कोकरांचाही समावेश आहे. यामुळे मेंढपाळाचे एकूण 12 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.