३५ दिवसांत ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

48

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

कर्जमाफीचा लाभ, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शासनाकडून घोषणा झाली असली, तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात नवीन वर्षात ३५ दिवसांमध्ये ९ आत्महत्या केल्या आहेत. घराचा करता पुरुषच गेल्याने आत्महत्यग्रस्त ९ कुटुंबेही उघड्यावर आली आहेत, असे असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची मदत दिलेली नाही. त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभाग गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचा मुकाबला करीत वाटचाल करीत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे उत्पादन घटले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. पण भाजपप्रणीत युतीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. गेल्या वर्षात मराठवाडा विभागात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे. नवीन वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत.

कर्जमाफीच्या योजनाचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब त्याचबरोबर बोंडआळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याकडे शासनाने केलेली टाळाटाळ ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. नवीन वर्षात ३५ दिवसांमध्ये संभाजीनगर जिल्ह्यात ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही ४ फेब्रुवारीपर्यंतची अधिकृत आकडेवारी असून गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात आणखी चार आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. याची प्रशासन स्तरावर अद्याप साधी नोंदही झालेली नाही. मदत मिळणे तर दूरच आहे. ३८ दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दमडीचीही मदत वाटप झालेली नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत केली जाते, असा गवगवा केला जातो. पण जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याच्या वारसाला मदत मिळालेली नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या