भाज्या कुटताना गुप्तांग ठेचले गेले, डॉक्टरांनी आयुष्य वाचवले

बत्त्याने भाज्या कुटत बसलेल्या 9 वर्षांच्या लहान मुलाने गडबडीत स्वत:चे गुप्तांग ठेचले. आफ्रिकी देश असलेल्या गॅबॉनमध्ये ही घटना घडली आहे. बत्ता चुकून दोन पायातील गुप्तांगावर बसल्याने हा मुलगा जबरी जखमी झाला होता. वेदनेने विव्हळणाऱ्या या मुलाला त्याच्या घरचे रुग्णालयात घेऊन आले की तो स्वत:च रुग्णालयात पोहोचला होता, हे डॉक्टरांनी सांगण्यास नकार दिला आहे. डॉक्टरांनी जेव्हा या मुलाची नीट पाहणी केली तेव्हा त्यांना गुप्तांगाचा एक तुकडा पडल्याचं दिसून आलं होतं आणि ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनली होती.

गुप्तांगातील मूत्र विसर्जनासाठी असलेली वाहिकेवर बत्त्याचा वार बसला होता, ज्यामुळे मुलाला अधिकच त्रास व्हायला लागला होता. डॉक्टरांनी कॅथेटरच्या मदतीने मुलाच्या मूत्रविसर्जनाचा मार्ग मोकळा केला आणि नंतर त्याला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. या मुलावरील शस्त्रक्रिया 100 टक्के यशस्वी झाली असून डॉक्टरांनी बत्त्याच्या वारामुळे वेगळा झालेला तुकडा गुप्तांगाला पुन्हा जोडला आहे. वर्षभरानंतर या मुलाची डॉक्टर पुन्हा तपासणी करणार असून त्यामध्ये तो पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे कळू शकेल.

हा मुलगा गॅबॉनची राजधानी असलेल्या लिबरविलेमध्ये राहातो. तो त्याच्या आईला घरकामात मदत करत होता. त्याला भाज्या कुटण्याचं काम देण्यात आलं होतं आणि त्याचवेळी त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर या मुलाला काही दिवस रुग्णालयातच त्यांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. शस्त्रक्रियेनंतर या मुलाला संसर्ग झाला होता, त्यामुळे त्याला जळजळ होत होती. संसर्ग कमी झाल्यानंतर त्याला होणारा हा त्रास कमी होत गेला. या मुलाला 25 दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं. या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय की अशा प्रकारच्या जखमा लहान मुलांमध्ये फार कमी पाहायला मिळतात, यामुळे त्यांच्यावरील उपचार हे आव्हानात्मक बनतात.