नऊ वर्षे, नऊ प्रश्न! काँग्रेसने नरेंद्र मोदींना घेरले

देशात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज नऊ वर्षे, नऊ प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जनतेला पंतप्रधान मोदी यांच्याकडून नऊ प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही वारंवार या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. तरीही पंतप्रधान आपले मौन सोडत नाहीत. त्यामुळे आतातरी पंतप्रधानांनी मौन सोडून जनतेला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असा हल्लाबोल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हाला नऊ प्रश्न विचारायचे आहेत. त्यासाठी आम्ही ‘9 वर्षे, 9 प्रश्न’ यासाठी एक पत्रक जारी करत असल्याचे जयराम रमेश यांनी शुक्रवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात स्पष्ट केले. विरोधी पक्षांसह जनतेकडून केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आतापर्यंत पंतप्रधानांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. मात्र आता पंतप्रधानांवर मौन सोडण्याची वेळ आली आहे, असे म्हणत जयराम रमेश यांनी नऊ प्रश्नांचा मारा केला आहे.

हे आहेत नऊ प्रश्न

– देशात महागाई आणि बेरोजगारी का गगनाला भिडत आहे? आर्थिक विषमता वाढूनही सार्वजनिक मालमत्ता पीएम मोदींच्या मित्रांना का विकली?

– तीन काळे कृषी कायदे रद्द करताना शेतकऱयांशी केलेल्या करारांचा आदर का केला गेला नाही? एमएसपीची कायदेशीर हमी का दिली नाही? गेल्या 9 वर्षांत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही?

– तुमचा मित्र अदानी याच्या फायद्यासाठी तुम्ही एलआयसी आणि एसबीआयमधील लोकांची कमाई का धोक्यात घालत आहात?

– पंतप्रधानांनी 2020 मध्ये चीनला क्लीन चिट देऊनही चीन भारताच्या भूमीवर का बसला आहे? चीनसोबत 18 बैठका झाल्या, तरीही त्यांनी भारतीय भूभाग सोडण्यास नकार का दिला?

– निवडणुकीच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक फुटीरतावादी राजकारणाला खतपाणी घालत समाजात भीतीचे वातावरण का निर्माण केले जात आहे?

– तुमचे जुलमी सरकार सामाजिक न्यायाचा पाया पद्धतशीरपणे का नष्ट करत आहे? महिला, दलित, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर तुम्ही गप्प का आहात? जातीनिहाय जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष का करत आहात?

– घटनात्मक मूल्ये आणि लोकशाही संस्था का ढासळल्या? विरोधी पक्ष आणि नेत्यांसोबत सूडाचे राजकारण का करताय? जनतेने निवडून दिलेली सरकारे पाडण्यासाठी तुम्ही खुलेआम पैशाच्या ताकदीचा वापर का करत आहात?

– अर्थसंकल्पात कपात करून मनरेगासारख्या लोककल्याणकारी योजना कमकुवत का झाल्या?

– कोरोनामुळे 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊनही मोदी सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास नकार का दिला? तुम्ही अचानक लॉकडाऊन का लादला, ज्यामुळे लाखो कामगारांना त्यांना कोणतीही मदत मिळता घरी परतावे लागले?