मुंबईत 90 टक्के बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण

26

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोवर-रुबेला मोहिमेमध्ये मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 90 टक्के तर राज्यामध्ये 96 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना ही लस देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी,आयएपी/आयएमए, रोटरी क्लबचे सदस्य यांच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यात सध्या गोवर-रुबेला हा आजार लहान मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बळावला असून मुंबईतील एफ दक्षिण व पी उत्तर वॉर्डमध्ये या आजाराची लागण झालेली मुले आढळून आली. लहान मुलांना आजारावरील लस मिळावी यासाठी अमिन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने गोवर-रुबेला मोहिमेत 22 लाख 67 हजार 365 मुलांचे म्हणजेच 90 टक्के मुलांना लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणामुळे एकाही बालकाचा मृत्यू नाही
मोहिमेच्या सुरुवातीला अल्पसंख्याकबहुल विभागातील शाळेत नकार देणाऱया पालकांची संख्या लक्षणीय होती, परंतु वारंवार पालक सभा घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांशी, धार्मिक व राजकीय नेत्यांशी संवाद साधून मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उर्वरित 10 टक्के बालकांनाही ही लस देण्यासाठी मोहीम सुरू असून गोवर-रुबेलामुळे एकही बालक मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या