समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात, 31 ठार

कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शंभर दिवसांत 900 अपघात झाले, तर 31 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मिंधे सरकारने घाईघाईत शुभारंभ केला, याला आज शंभर दिवस झाले आहेत. नागपूर ते शिर्डीपर्यंत हा महामार्ग सुरू झाला आहे. या महामार्गावर वाहनांची स्पीड मर्यादा 120 किमीची आहे. पहिल्या दिवसापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. सर्वात जास्त अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाले आहेत. 46 अपघात हे वाहनांतील तांत्रिक बिघाडांमुळे झाले आहेत. अपघातांवर अंकुश लावण्यासाठी एक समिती नेमली होती. ती समिती घटनांचा अभ्यास करीत आहे.

धक्कदायक बाब म्हणजे 46 टक्के अपघात हे ब्रेकडाऊनमुळे झाल्याचे पुढे आले, तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाले व 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यामुळे गाडी बंद पडल्यानेही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.