मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 900 पेक्षा जास्त कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या 17,512 वर

801

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी नऊशेपार कोरोनाबाधित नोंदवले गेले असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 512 वर पोहोचली आहे. प्रलंबित 231 पॉझिटिव्ह रिपोर्टसह 933 नवीन रुग्ण शुक्रवारी नोंदवले गेले.

मुंबईत गेल्या एकाच दिवसात 334 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 4568 झाली आहे. दरम्यान, 34 मृतांमध्ये दहा प्रलंबित अहवालांचा समावेश असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मृतांमधील 13 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते. तर 16 जणांना दीर्घकालीन आजार होते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, धारावीत नवे 84 रुग्ण आढळल्याने याठिकाणची रुग्णसंख्या 1154 झाली. दादरमध्ये 11 नवे रुग्ण आढळल्याने या ठिकाणची एकूण रुग्णसंख्या 150 झाली, तर माहीममध्ये 14 रुग्ण आढळल्याने या ठिकाणची एकूण रुग्णसंख्या 176 झाली आहे.

बेस्ट बस रुग्णवाहिका
कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांची ने-आण करण्यासाठी बेस्ट बसही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक विभागाच्या आयुक्तांनी पुरवलेल्या गाड्याही रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. रुग्णवाहिकांमधील चालक आणि मदतनीस यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट देण्यात येत आहेत. यामध्ये बेस्टच्या 70 बस, एसटीच्या 15 गाड्या तैनात आहेत. याशिवाय ‘108’ रुग्णसेवेतील 60 आणि पालिकेच्या आणखी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आपत्कालीन विभागात आणखी सहा जणांना कोरोना

पालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन विभागातील आणखी सहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन विभागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता चौदावर पोहोचली आहे. दरम्यान, मुख्यालयाच्या आपत्कालीन विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले असले तरी काम सुरूच राहणार असल्याचे विभागप्रमुख महेश नार्वेकर यांनी सांगितले. आपत्कालीन विभागात सध्या सोशल डिस्टन्स पाळून काम केले जात आहे. शिवाय वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या