९१व्या साहित्य संमेलनास बुलडाण्याचा मुहूर्त

29

सामना प्रतिनिधी । नागपूर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यात होणार आहे. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बुलडाण्यातील स्वामी विवेकानंद आश्रम (हिवरा आश्रम)ची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. अभा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भा. जोशी यांनी नागपूरात पार पडलेल्या बैठकीमध्ये ही घोषणा केली.

बैठकीमध्ये समितीने निर्धारित केलेल्या दिल्ली मराठी प्रतिष्ठान (दिल्ली), राठी वाङमय परिषद (बडोदा) आणि विदर्भातील स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा (बुलडाणा) या तीन स्थळांवर चर्चा करण्यात आली. साहित्य संमेलनाचे स्थळ निवडण्यासाठी स्थळ निवड समितीचे ७ आणि मंडळाचे ९ सदस्य हजर होते.

समितीने १९-२० ऑगस्ट रोजी दिल्ली आणि बडोदा येथील स्थळांची पाहणीकेली होती, तर ९ सप्टेंबरला हिवरा आश्रमाची पाहणीकेली होती. दिल्लीने तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेतल्याने बडोदा आणि बुलडाणामध्ये चुरस होती. मात्र स्थळ समितीने बुलडाण्यावर अंतिम मोहोर उमटवली आहे.

बुलडाण्यातील हिवरा आश्रमापूर्वी ८५वे साहित्य संमेलन विदर्भातील चंद्रपूर येथे झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर विदर्भाला पुन्हा एकदा साहित्य समेलनाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.

अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अध्यक्ष निवडीची प्रक्रीया ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर अध्यक्षांची घोषणा १० डिसेंबरला केली जाईल. अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना १४ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, तर २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. २३ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येईल. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदारांकडे मतपत्रिका रवाना करण्यात येतील. ९ डिसेंबरपर्यंत निर्वाचन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतील आणि १० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर अध्यक्षपदाचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या