जिवंत कासव झालं ‘पिग्गी बँक’, पोटातून निघाली ९१५ नाणी

137

सामना ऑनलाईन । बँकॉक

बँकॉकमधील एका तलावात राहणाऱ्या कासवाच्या पोटातून तब्बल ९१५ नाणी निघाली आहेत. ऑमसिन नावाचं हे मादी कासव २५ वर्षांचं आहे. कवचाला तडा गेल्यामुळे ऑमसिनला पशुवैद्यांकडे नेण्यात आलं होतं. तिथे एक्स रे तपासणीत तिच्या पोटात नाणी असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ९१५ नाणी काढली. वेगवेगळ्या देशांची नाणी तिच्या पोटात सापडली आहेत. या नाण्यांचं वजन सुमारे पाच किलो इतकं आहे.

या घटनेने अचंबित झालेल्या डॉक्टरांनी कासव राहत असलेल्या तळ्याची पाहणी केली. ऑमसिन राहते ते तळं चोनबरी प्रांतातल्या एका बागेतलं गुडलक तळं म्हणून प्रसिद्ध आहे. बागेला भेट देणारे पर्यटक इच्छापूर्तीसाठी किंवा दीर्घायुष्यासाठी या तळ्यात नाणी फेकतात. अन्नाचा शोध घेताना अन्नासोबत ऑमसिनने नाणीही गिळली होती.

ऑमसिनला पूर्ण बरं होण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. ती बरी झाली तर ८० वर्षांपर्यंत जगेल. मात्र, स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मुक्या जीवांशी खेळणं हे एक दुष्कर्म आहे, असं तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरने म्हटलं आहे.

coins-from-turtule-stomach

आपली प्रतिक्रिया द्या