बडोद्यात स्वतंत्र्य हिंदुस्थानातील पहिले मराठी साहित्य संमेलन

58

सामना प्रतिनिधी । नागपूर

आठ दिवसांच्या ‘राजकीय’ घडामोडींनंतर ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा महामंडळाने सोमवारी केली. मराठवाडा साहित्य परिषदेने अखेरच्या क्षणापर्यंत सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने साहित्य वर्तुळात उमटत आहे.

साहित्य संमेलनासाठी या शहरांमध्ये होती स्पर्धा

हिवरा आश्रमने वादानंतर माघार घेतल्यानंतर बडोद्याचा एकमेव पर्याय महामंडळापुढे होता. गेले पाच दिवस बडोद्यातील मराठी वाङ्‌मय परिषदेची तयारी आहे किंवा नाही, याची चाचपणी करण्यात आली. बडोद्याकडून तयारी असल्याचे पत्रही प्राप्त झाले. महामंडळाच्या कार्यकारिणीशी सल्लामसलत केल्यानंतर अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बडोद्याला यजमानपद देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास यजमान संस्थेकडून निर्णय मान्य असल्याचे पत्र प्राप्त झाल्यावरच बडोद्याची घोषणा करण्यात आली.

साहित्य संमेलनाच्या आयोजनातून विवेकानंद आश्रमाची माघार

‘महामंडळाच्या सर्व सभासदांकडे परिपत्रक पाठवून महामंडळाची कामे करण्याचा जो अधिकार महामंडळ अध्यक्षांना दिलेला आहे, त्या अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानुसारच रितसर प्रक्रिया पार पाडून महामंडळाने निर्णय घेतला,’ असे डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यापूर्वी १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन साहित्य संमेलने बडोद्यात झालेली आहेत. त्यामुळे स्वतंत्र हिंदुस्थानात होणारे बडोद्यातील हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल.

आपली प्रतिक्रिया द्या