छातीला चादर बांधून खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न, 91 वर्षांच्या आजोबांचा मृत्यू

इटलीच्या पापोझी भागातील वृद्धाश्रमातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 91 वर्षांच्या आजोबांचा मृत्यू झालाय. चादरीचा दोर बनवून खिडकीच्या वाटेने पळून जायचा ते प्रयत्न करत होते. मारियो फिनोटी असं या आजोबांचं नाव आहे. मारियो हे ऑपेरा पिया फ्रान्सेस्को बोट्टानी नावाच्या वृद्धाश्रमात राहात होते.

वृद्धाश्रमाच्या पहिल्या मजल्यावर राहात असलेल्या मारियो यांनी छातीला चादर बांधली होती आणि खिडकीतून बाहेर पडत चादरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरायचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र खिडकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि लटकलेल्या अवस्थेतच त्यांचे प्राण गेले. मारियो यांना मूलबाळ नव्हते, त्यांनी लग्नही केलेले नव्हते.

मारियो यांनी पळून जायचा प्रयत्न करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं कळताच वृद्धाश्रमाचे संचालक लुका अवांझी यांना मोठा धक्का बसला. गेल्याच आठवड्यात मारियो यांनी त्यांच्या पुतणीशी व्हिडीओ कॉलवरून गप्पा मारल्या होत्या असं सांगताना लुका यांनी मारियो हे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत होते असं म्हटलंय. मारियो यांचा मृतदेह पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला असून ते मारियो यांच्या अंत्यसंस्कार करणार आहेत. कोरोना काळात मारियो यांना फारसं बाहेर जाता येत नव्हतं. त्यांना एकाकी वाटत असावं म्हणून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज पापोझीचे महापौर पिअरलुईगी मोस्का यांनी व्यक्त केला आहे.