बीड जिल्ह्यात 18 छावण्यांना वगळून 93 कोटींच्या बिलाचे वाटप

सामना प्रतिनिधी । बीड

जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या छावण्यांची यापूर्वी दोनवेळा तपासणी झालेली आहे. दुसऱ्या तपासणीमध्ये अनेक छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत तफावत आढळून आली असून 18 छावण्यांना नोटीसा बजावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा जिल्हाभरातील छावण्यांची अचानक तपासणी होणार आहे.

बीड जिल्ह्यात 600 चारा छावण्या सुरू आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या तपासणीमध्ये अनेक छावण्यांची बोगसगिरी समोर आली. त्यापैकी 18 छावण्यांना नोटीसा बजावल्या असून त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा सर्व छावण्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येवून छावण्यांची तपासणी केली त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे न देता ते स्वत: सोबत घेवून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा छावण्यांची तपासणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.

अचानक होणाऱ्या तपासणीमध्ये जनावरांची संख्या आणि दैनंदिन रिपोर्ट याची पडताळणी केली जाणार आहे. अडीच महिन्यापासून छावण्या सुरू असूनही त्यांना बिले देण्यात आली नव्हती. त्यामुळे छावणी चालकांनी बंदचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर छावण्यांसाठी आलेल्या 103 कोटी रूपयांच्या निधी पैकी 93 कोटी रूपयांचे वाटप संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 18 छावण्यांमध्ये बोगसगिरी आढळून आल्याने त्यांच्याकडून खुलासे मागविले आहेत. ते खुलासे समाधानकारक आल्यास त्यांना बिले देण्यात येणार आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून बिलातून ती रक्कम वजा केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.