93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

523

जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षापासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी दिली. धाराशिवकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी धाराशिव येथे होत आहे. या संमेलनाची आयोजक मराठवाडा साहित्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनाध्यक्ष पदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. साहित्य संमेलन अधिकाअधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्पâत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते. धाराशिवकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळ्यास येण्याचे मान्य केले आहे.

महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अिंजठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश व संजीवन ही पुस्तके वाचकांचा मनाचा ठाव घेतात. जैत रे जै, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी मराठी रसिकजनांच्या ओठी आजही कायम आहेत.

ना. धों. महानोर यांना भारत सरकारने 1991 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. 2000 साली त्यांच्या पानझड या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संमेलनात तीन दिवस चालणाऱ्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धों. महानोंर यांच्या निवडीचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मराठवाडयातील साहित्यिक, विविध संस्था, संघटनांनी स्वागत केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या