मल्ल्या, मोदी आणि चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांना हस्तांतरीत केली

हिंदुस्थानातील बँकांना कोट्यवधींचा चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्या याचे 5,825 कोटी रुपये समभाग विकण्यात आले आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन मल्ल्या फरार झाल्याने बँकांचे आर्थिक नुकसान झाले होते. समभाग विक्रीतून बँकांना झालेल्या नुकसानीपैकी 70 टक्के रक्कम वसूल करण्यात अंमलबजावणी संचलनालयाला यश आल्याचं सांगितलं जात आहे. समभाग विक्रीतून मिळालेला पैसा परत बँकांना हस्तांतरीत करण्यात आल्याचं कळतंय.

युनायटेड ब्रुवरीज या कंपनीतील मल्ल्या याचे 5825 कोटींचे समभाग हाईनकेन कंपनीला विकल्याचं सांगण्यात येत आहे. मल्ल्याने बँकांना 9900 कोटींचा चुना लावला होता त्यातील 70 टक्के रक्कम आतापर्यंत वसूल करण्यात आली असल्याचंही कळतंय. यापूर्वी मल्ल्या याचे युनायटेड ब्रुवरीज आणि युनायटेड स्पिरीट लिमिटेड या कंपन्यातील 1357 कोटींचे समभाग विकण्यात आले होते. येत्या काळात मल्ल्याचे 800 कोटींचे समभाग विकण्याची तयारी सुरू केली असून हे काम 25 जूनपर्यंत पूर्ण होईल. मल्ल्याने हे सगळे समभाग बेनामी पद्धतीने खरेदी केले होते.

फक्त मल्ल्याच नाही तर अंमलबजावणी संचलनालयाने मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनाही दणका दिलाय. या तिघांची मिळून अंमलबजावणी संचलनालयाने 18,170.02 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीचा बाजारभाव हा आकडा बँकांना सहन कराव्या लागलेल्या नुकसानाच्या 80 टक्के रकमे इतका आहे. मल्ल्या, मोदी आणि चोक्सी या तिघांनी मिळून हिंदुस्थानातील बँकांना 22,585 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या