श्रमिक रेल्वेमध्ये 97 मजुरांचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला याची माहिती केंद्र सरकारकडे नव्हती. आता मजुरांसाठी चालवलेल्या ट्रेनमध्ये 97 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकाराने दिली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी लिखित प्रश्न विचारला होता. त्यावर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हे उत्तर दिले आहे.

पियुश गोयल यांनी दिलेल्या माहितेनुसार मजुरांसाठी त्यांना घरी पोहोचण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. यात 97 मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 87 मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यापैकी 51 मृतदेहांचे शवविच्छेदनाचे अहवाल मिळाले आहेत. त्यात हृदय विकाराचा झटका, हृदय रोग, ब्रेन हॅमरेज, जुने आजार, फुफ्फुसांचा आजार मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून 63 लाख 19 हजार मजुरांना आपल्या घरी सोडण्यात आले अशी माहिती गोयल यांनी दिली.

या ट्रेनमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले होते. या काळात ट्रेनमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता असेही गोयल यांनी नमूद केले

पण ही माहिती फक्त रेल्वेने प्रवास केलेल्या मजुरांची आहे. रस्ते अपघातात किती मृत्यू झाले याची अधिकृत आकडेवारी सरकारने दिलेली नाही. सेव्ह लाईफ फौंडेशनच्या डेटानुसार लॉकडाऊन काळात देशात 1461 रस्ते अपघात झाले. यात 750 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये किमान 198 मजूर आहेत. रेल्वे अपघात, उपासमार, श्रमिक ट्रेनमधील मृत्यू ही संख्या वेगळी आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात देशभरातून 1 कोटी 4 लाख 66 हजारांवर मजुरांनी स्थलांतर केले. यातील सर्वाधिक 32 लाख 49 हजारांवर मजूर उत्तर प्रदेशात घरी परतले. 15 लाखांवर मजूर बिहारमध्ये परतले. श्रमिक ट्रेन, बसेसमधून हे स्थलांतर झाले. लॉकडाऊन काळात किती मजुरांचा मृत्यू झाला याची माहिती सरकारकडे नाही. याबाबतचा डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे नुकसानभरपाई देता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या