आई-वडील रागावले म्हणून नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

46

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शाळेत जात नसल्याने आई-वडील रागावल्याने ९ वीत शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता वडगाव कोल्हाटीत उघडकीस आली. माहिती देऊनही पोलिसांनी तब्बल दोन तासानंतर घटनास्थळी पोहोचून मृतदेह रुग्णवाहिकेने घाटीत पाठवला. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वडगाव कोल्हाटी येथील नागोराव मुसने हे खासगी कंपनीत कामगार आहेत. त्यांचा मुलगा तेजस हा बजाजनगरातील राजा शिवाजी शाळेत नववीच्या वर्गात शिकतो. तीन दिवसांपासून तो शाळेत जात नसल्याने आज सकाळी वडील रागावले. त्यानंतर दोघे पती-पत्नी हे कंपनीत कामाला गेले. आई-वडील रागावल्याचा राग अनावर झाल्याने तेजस याने राहत्या घरी गळफास घेतला. सायंकाळी पाच वाजता आई- वडील घरी परतले असता, त्यांना तेजस हा लटकलेला दिसला. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी घराच्या दिशेने धाव घेतली. फासावरून खाली उतरविल्यावर घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. माहितीr दिल्यानंतरसुद्धा पोलिसांनी येण्यास टाळाटाळ केली. अखेर दोन जणांनी ठाण्यात पोहोचून माहिती दिल्यावर उपनिरीक्षक खरात हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचे वन मोबाईल आणि टू मोबाईल वाहन घटनास्थळी असतानासुद्धा उपनिरीक्षक खरात यांनी हेकेखोरपणा करत तेजसचा मृतदेह पोलिसांच्या वाहनात घाटीत न नेता १०८ वाहनाला पाचारण केले. तब्बल अध्र्या तासानंतर १०८ वाहन आले, तेव्हा पोलिसांनी तेजसचा मृतदेह घाटीत पाठवला. पोलिसांच्या हेकेखोरपणामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या