
राजस्थानच्या बांसवाडा जिह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. कर्जबाजारी इसमाने विमा पॉलिसीचे पैसे हडपण्यासाठी भिकाऱ्याला ठार करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी हा डाव उद्ध्वस्त करत दोघांना बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
काही दिवसांपूर्वी सल्लोपाठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना राष्ट्रीय महामार्ग 56 वर अज्ञात मृतदेह सापडला. गाडीने चिरडल्याने मृतदेहाची ओळख पटणे कठीण होते. मृतदेहाजवळ एक बॅग होती. त्या बॅगेतील कागदपत्रांवर नरेंद्र सिंह रावत यांचे नाव होते. मात्र कुटुंबीयांनी मृतदेह नरेंद्र सिंह रावतचा नसल्याचे सांगितले. मृतदेह तुफान सिंह नावाच्या भिकाऱ्याचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले.