सत्यजित रे यांचे 100 वर्षे जुने घर बांगलादेश सरकारने पाडले

प्रख्यात सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांचे ढाका येथील तब्बल 100 वर्षे जुने घर बांगलादेश सरकारने जमीनदोस्त केल्याचे वृत्त आहे. हे सत्यजित रे यांचे वडिलोपार्जित घर असून हा ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली होती. हे अत्यंत चिंताजनक वृत्त असून हिंदुस्थान सरकारने हा ठेवा जतन करण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. सत्यजित रे यांची नाळ बंगाली संस्कृतीशी घट्ट जोडली गेली होती. त्यामुळे त्यांचे घर हे बंगालच्या ऐतिहासिक संस्कृतीचा अत्यंत मौल्यवान ठेवा आहे, असा माझा विश्वास आहे, असे ममता बॅनर्जी यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.