
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढली असून ठाणेकर वाहतूककोंडीने बेजार झाले आहेत. मात्र ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर आली आहे. वाहतूक शाखेने महापालिकेसोबत संयुक्त कारवाई करत वागळे इस्टेट परिसरातील 22 बेवारस गाड्यांची उचलबांगडी केली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक शाखेने महापालिकेच्या मदतीने संयुक्त कारवाई करत वागळे इस्टेट परिसरातील 22 बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांना नोटिसा बजावल्या. मात्र एक महिना उलटूनही वाहनमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या बेवारस गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या गाड्या क्रेनच्या सहाय्याने उचलून डम्पिंग यार्डला जमा केल्या आहेत. पुढील 15 दिवसांत मालकांनी गाड्या सोडवल्या नाही, तर त्या गाड्यांचा भंगारात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली. ही कारवाई टप्प्याटप्प्याने संपूर्ण ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.




























































