
नवी मुंबई महापालिकेची तब्बल सहा वर्षांनंतर होणारी पहिलीच महासभा वादग्रस्त प्रस्तांवामुळे उद्या वादळी ठरणार। आहे. या महासभेत स्विकृत सदस्यांसह परिवहन समितीच्या सदस्यांची निवडणूक होणार आहे. स्विकृत सदस्यांसाठी भाजप आणि शिंदे गट यांनी पक्षीय बलाबलनुसार उमेदवार दिले असले तरी परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत मात्र दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्यात आले आहेत. एनएमएमटीतून शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखल्याने उद्याच्या महासभेत वादाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्या होणाऱ्या पहिल्या महासभेत नगररचना, अभियांत्रिकी, आरोग्य आदी विभागांमध्ये प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मिळालेला भूखंड रद्द करण्याचा प्रस्तावही आणण्यात आला आहे.
शिंदे गटाला दाखवला जाणार कात्रजचा घाट
परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा प्रस्तावही याच महासभेत आणण्यात आला आहे. परिवहन समितीमध्ये एकूण 12 सदस्य आहेत. हे सर्वच सदस्य निवडून आणण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. सभागृहात मतदान घेऊन जर ही निवडणूक झाली तर शिंदे गटाचा एकही सदस्य परिवहनमध्ये जाणार नाही. गेल्या वेळीही भाजपने परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत हाच फंडा वापरला होता. त्यामुळे शिंदे गटाचे परिवहन समितीचे उमदेवार टेन्शनमध्ये आले आहेत.
ठाणे पालिकेची महासभा तहकूब होणार
ठाणे : तब्बल चार वर्षांनंतर ठाणे महापालिकेची पहिली महासभा उद्या शुक्रवारी होणार आहे. महासभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांसह विरोधी पक्षनेता, सभागृह नेता आदींची निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या पहिल्याच महासभेत 19 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने पहिलीच महासभा पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात येणार आहे.





























































