
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर खबरदार.. असा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी चलो आझाद मैदानचा नारा दिला आहे. कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धडक देणार आहेत.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव, भगिनींनी मागील पाच वर्षे आंदोलने केली आहेत. तसेच सिडकोला लाखोंच्या संख्येने घेरावही घातला होता. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या या विविध आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा ठराव मंजूर केला आहे. मंजूर केलेला ठराव राज्य सरकारने पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवून दिला आहे, पण आज तीन वर्षे होऊनही केंद्र सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले
3 ऑक्टोबर 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले. 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. तरीही दि. बा. पाटील यांचे नाव दिलेले नाही.





























































