
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर, ‘दै. सामना’चे वृत्तछायाचित्रकार संदीप पागडे, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, महाराष्ट्र टाइम्सचे माजी मुद्रितशोधक दिगंबर सावंत, दै. नवराष्ट्रचे रामकृष्ण खांदारे आणि पत्रकार राजेंद्र साळसकर हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. रोख रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. पत्रकार भवन येथे २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘द प्रिंट’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पत्रकार संघाने बहुभाषिक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक स्व. शरद वैद्य यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट निवेदक-सूत्रसंचालकासाठी पुरस्कार सुरू केला असून या पहिल्या पुरस्कारासाठी ज्ञानदा कदम यांची निवड केली आहे. या समारंभात वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिले जाणार आहे.
पुरस्काराचे मानकरी
‘तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’
पुरस्कार : संदीप पागडे.
‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : रामकृष्ण खांदारे.
‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार
: दिगंबर सावंत.
‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार : राजेंद्र साळसकर
‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’
: जयंत माईणकर.

























































