पोहायला गेलेले पाच मित्र वर्धा नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला; चौघांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली. जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगत असलेल्या माथारदेवी गावाजवळील नदी काठावर सोमवारी ही घटना घडली. सम्यक देवराव सोनटक्के (18), संनी अशोक आस्मपेल्ली (19), रोहित बाबाराव बोबडे (19), शिव भास्कर केलझरकर (19), तन्मय नवनाथ पथाडे (18) अशी मयत मित्रांची नावे आहेत. सर्वजण घुग्घूस शहरातील इंदिरा नगर परिसरातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही तरूण सोमवारी पोहण्यासाठी वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. नदीकाठी कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान बचाव पथकाला एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप उर्वरित चार युवकांचा शोध सुरू आहे.

पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. बेपत्ता सर्व युवकांचे वय अंदाजे 15 ते 17 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.