वाडा ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा ‘आयसीयू’त; गंभीर रुग्णांना धरावी लागते ठाणे, मुंबईची वाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. मात्र याला चार वर्षे उलटून गेली तरीही रुग्णालयाचा विस्तार ‘आयसीयू’मध्ये अडकला आहे. ग्रामीण रुग्णायलाची क्षमता वाढवण्यासाठी नव्या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र जागेअभावी अद्यापपर्यंत एक वीटही रचली न गेल्यामुळे या भागातील गोरगरीब आदिवासी रुग्णांची मोठी परवड होत आहे. त्यांना उपचारासाठी ठाणे किंवा मुंबईची वाट धरावी लागत आहे.

सन 1960 साली 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले होते. आता 61 वर्षांनंतरही हे रुग्णालय जसेच्या तसे आहे. रुग्णालयात पुरुष व महिला यांच्यासाठी वेगवेगळे कक्ष आहेत. तालुक्यात औद्योगिकीकरणामुळे हजारो कामगारांनी येऊन वास्तव केले आहे. तालुक्यातील लोकसंख्या तीन ते चार पटीने वाढली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने चार वर्षांपूर्वी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. जागेच्या अभावामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडले आहे.