इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट होताच मेटाचा पोलिसांना अलर्ट; ८ मिनिटांत वाचले तरुणाचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका २५ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टनंतर ‘मेटा’ कडून मिळालेल्या सुसाईड अलर्टवर मेरठ पोलिसांनी तातडीने कारवाई केली. अवघ्या आठ मिनिटांत त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला रुग्णालयात दाखल करत त्याचे प्राण वाचवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेश पोलीस आणि मेटा यांच्यातील समन्वय यंत्रणेमुळे ही घटना समोर आली; ही यंत्रणा आत्महत्येसंदर्भातील संकेत देणाऱ्या पोस्ट ‘फ्लॅग’ करते आणि त्याबाबतचा अलर्ट प्रशासनाला पाठवते.

सोमवारी पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, मेरठच्या सरधना भागातील रहिवासी असलेल्या या तरुणाने ७ जून रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो सफेद रंग असलेला पदार्थ प्यायल्याचे दिसत होते. या व्हिडिओसोबत ‘अब तुम खुश रहना अपनी लाइफ में’ असा संदेश लिहिलेला होता. या व्हिडीओ आणि कॅप्शनचा अर्थ गंभीर असल्याचा लक्षात घेत मेटाने पोलिसांना अलर्ट पाठवला. पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत त्या तरुणाला गाठले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने तरुणाचा जीव वाचल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.