
उड्डाण घेताच पक्षी धडकल्याने राजकोटहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिग करण्यात आले. राजकोटच्या हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान राजकोटहून दिल्लीला चालले होते. विमानात 124 प्रवासी होते. हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच विमानाला पक्षी धडकला. पक्षी धडकल्यानंतर वैमानिकाला विमानाच्या इंजिन आणि इतर तांत्रिक प्रणालींमध्ये बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे विमान माघारी वळवून राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या इंजिनच्या पंख्याच्या पात्यांचे नुकसान झाले आहे. सध्या तांत्रिक टीम दुरुस्तीचे काम करत आहे. दुरुस्तीनंतर डीजीसीए (DGCA) टीम उड्डाणाची सविस्तर तपासणी करेल. त्यानंतर विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात येईल.

























































