
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुदत ठेवी (एफडी) आणि इतर बँक ठेवींवरील व्याजदर अधिक पारदर्शक आणि लवचिक करण्याच्या उद्देशाने नवे मसुदा नियम प्रस्तावित केले आहेत. या प्रस्तावांमुळे बँकांना मोठ्या ठेवींवरील व्याजदर निश्चित करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार असले, तरी ग्राहकांना विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अधिक सोपे होणार आहे.
आरबीआयने हे मसुदा नियम सार्वजनिक सूचना आणि अभिप्रायासाठी जारी केले असून नागरिकांना 20 जूनपर्यंत आपली मते नोंदवता येणार आहेत. या नियमांचा मुख्य उद्देश ठेवींवरील व्याजदरांच्या माहितीमध्ये एकसमानता आणणे आणि मोठ्या ठेवींवरील व्याजदर ठरविण्याबाबत बँकांना अधिक लवचिकता देणे हा आहे.
व्याजदर जाहीर करणे बंधनकारक
प्रस्तावित नियमांनुसार, सर्व बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी त्यांच्या संकेतस्थळावर विविध ठेवी योजनांचे व्याजदर जाहीर करावे लागतील. ग्राहकांना एफडी आणि इतर ठेवी योजनांच्या व्याजदरांची माहिती आधीच उपलब्ध होणार असल्याने विविध बँकांतील योजनांची तुलना करणे अधिक सोपे होईल. यामुळे व्याजदरांबाबतची अस्पष्टता कमी होऊन गुंतवणूकदारांना अधिक स्पष्ट माहिती मिळेल.
मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर
प्रस्तावित बदल मुख्यतः ‘बल्क डिपॉझिट’ म्हणजेच मोठ्या रकमेच्या ठेवींशी संबंधित आहेत. वैयक्तिक गुंतवणूकदार, कंपन्या, संस्था आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांकडून ठेवण्यात येणाऱ्या मोठ्या ठेवींवर बँका त्यांच्या निधीच्या गरजेनुसार वेगवेगळे व्याजदर देऊ शकतील.
आरबीआयच्या मते, एखाद्या बँकेला अधिक निधी उभारण्याची आवश्यकता असल्यास ती मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदर देऊ शकते. उलट, पुरेशी Liquidity असलेल्या बँका कमी व्याजदरही देऊ शकतील.
सर्वसामान्य एफडी गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
या प्रस्तावांचा किरकोळ एफडी गुंतवणूकदारांवर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, कारण हे नियम थेट रिटेल एफडीशी संबंधित नाहीत. मात्र, तज्ज्ञांच्या मते भविष्यात याचा संपूर्ण ठेवी बाजारावर परिणाम होऊ शकतो.
प्रमाणित आर्थिक नियोजक (सीएफपी) श्वेता शास्त्री यांच्या मते, आतापर्यंत बहुतांश बँकांचे एफडी व्याजदर साधारण सारखे असत. मात्र, भविष्यात ठेवीची रक्कम, कालावधी आणि बँकेच्या निधीच्या गरजेनुसार व्याजदरांमध्ये लक्षणीय फरक दिसू शकतो. त्यामुळे एफडीचे नूतनीकरण करण्यापूर्वी विविध बँकांचे दर तपासणे आवश्यक ठरेल. मोठी रक्कम गुंतवताना अधिक चांगल्या व्याजदराबाबत बँकेशी चर्चा करणेही फायदेशीर ठरू शकते.
एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या बाबी तपासा
मुदतपूर्व एफडी मोडल्यास आकारला जाणारा दंड
स्वीप-इन एफडी सुविधा उपलब्ध आहे का?
गरज पडल्यास निधी सहज उपलब्ध होतो का?
व्याज देण्याची पद्धत (मासिक, तिमाही किंवा मुदतपूर्तीनंतर)
बँकेची विश्वासार्हता आणि आर्थिक स्थिती
सध्या कोणत्या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज?
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक– 8.10 टक्क्यांपर्यंत
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक– 8.10 टक्क्यांपर्यंत
जना स्मॉल फायनान्स बँक– 7.77 टक्क्यांपर्यंत






























































