
आतापर्यंत कौटुंबिक अत्याचार, विवाहबाह्य संबंध किंवा वैवाहिक वादातून घटस्फोट झाल्याच्या घटना पाहिल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घटस्फोटाची अजब घटना उघडकीस आली आहे. पतीने हनिमूनला कुटुंबाला नेले म्हणून पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली आहे. समुपदेशनानंतरही नवविवाहित जोडप्यातील वाद मिटला नाही.
मेरठमधील एका नवविवाहित पतीने आपल्या हनिमूनला आई-वडील आणि भावंडांना सोबत नेले. यामुळे नवविवाहिता नाराज झाली. कुटुंब सोबत आल्याने पतीसोबत एकांतात वेळ घालवता आला नाही, असे पत्नीचे म्हणणे आहे. मात्र हनिमूनला कुटुंबाला नेणे यात काहीच गैर नसल्याचे पतीचे म्हणणे आहे. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की प्रकरण थेट कोर्टात पोहचले.
कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनानंतरही पती-पत्नीतील वाद मिटला नाही. समुपदेशनाचे तीन सेशन केल्यानंतर जोडप्यातील तणाव वाढतच गेला. समुपदेशकांनी अलीकडेच आणखी एक सेशन घेतले असून, दोघांनाही त्यांच्या भविष्याबद्दल विचार करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.
जोडप्याचा विवाह एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून जुळला होता. पत्नी पदवीधर आहे, तर पतीने सिंगापूरमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.


























































